Saturday, 28 February 2015

अवेळीच आला पाऊस!

हे काही पावसाचे दिवस नव्हेत.
आत्ता कुठे पळस आणि शाल्मलीत पेटून फुलण्याची स्पर्धा लागली आहे.....
थंडीच्या दिवसांत लपेटून घेतलेल्या दुलया कपाटात गेल्या आहेत....
द्राक्षं ,कलिंगडाचे  ढीग आत्ता कुठे खुणावायला लागले आहेत....

आणि अशातच आज पाऊस!

अवेळी पाऊस म्हणजे आंब्याचं नुकसान, वातावरणात होणाऱ्या बदलांची चिंता....
अवेळी पाऊस म्हणजे ठरलेल्या कामांत विघ्न.....
अवेळी पाऊस म्हणजे भिजलेल्या कपड्यांची काळजी.......


पण या अवेळी पावसानं आज चहाच्या कपात आल्याचा स्वाद आणला.....
सगळी कामं सोडून घरीच बसलेल्या माणसांत गप्पांचा फड रंगला....
ध्यानीमनी नसताना उठलेला  मातीचा दरवळ जुनं काहीतरी सोबत घेऊन आला...

आपण या हवामानचक्राच्याही आहारी गेलोय का हो? हिवाळा संपता संपता आलेल्या पावसाचं आपल्याला इतकं का आश्चर्य वाटतं? आलं असेल आभाळाच्या मनात, की चला आज बरसून जाऊ.......
मनात साठवलेलं काहीतरी उधळून देऊ.......
पाऊस जरासा थांबल्यावर मी रस्त्यावर चक्कर मारून आले आणि मातीच्या गंधाचा, ओल्या हवेचा, गरम गरम बटाटेवड्यांचा वास नाकात घेऊन परत आले.
कुठे छत्री घेऊन जाणारी माणसे दिसली, पावसांत भिजण्याचा निखळ आनंद लुटणारी पोरं दिसली.
अचानक आलेल्या पावसानं खुळावलेलं मन घेऊन त्याचा किंवा तिचा हात हातात घेणारी तरुणाई दिसली....

आपल्याला अपेक्षित नसणारं काही घडलं की चिंता कशाला करायची? बस, स्वार व्हायचं त्या बेभान क्षणावर आणि उंच उडून यायचं.
पक्षी करतात का चिंता, ग्लोबल वॉर्मिंगची? किंवा तुरुतुरु धावणाऱ्या मुंग्यांना येतं का धान्य साठवणीचं टेन्शन ? दूर कुठेतरी हजारो मैलांवर घडणारा हा निसर्गाचा चमत्कार..... जरा खुलेपणानं दाद देऊया की त्याला.....
मातीकडे झेपावणाऱ्या थेंबांना कुठे ठाऊक असतं की आता फेब्रुवारी महिन्यात आपण असं कोसळायचं नसतं म्हणून? त्यांना आस असते फक्त धरतीची.......

असे अवेळी पाऊस यावेत. त्यानिमित्ताने आपल्याला जगण्याचे चक्र मोडायची संधी मिळते.
पाऊस आवडतो, वारा हवा असतो, ओली हवा हुंगायची असते.....
मग जून महिन्याची वाट कशाकरता पाहायची?
ढग दिसले की आपण बरसून जायचं.......
वारा सुटला की आपण उडायला लागायचं........
थेंब पडायला लागले की आपण गंधाळून जायचं....
अवेळी पाऊस आला की आपणही अवेळी खूष होऊन जायचं.......


1 comment: