आपण थोडं तरी संवेदनशील व्हायचं का?
बंदुकीतून
सुटलेली गोळी ज्या माणसावर झाडली जाते त्याच्या शरीरावर जीवघेणे आघात करत खोल
घुसते. जखम होते, रक्तस्त्राव होते आणि त्याच्या जीवन-मरणाचा झगडा सुरु होतो.
डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करून गोळ्या बाहेर काढतात आणि त्याचे प्राण वाचवतात.
पण
त्या धातूच्या गोळीसोबत अनेक जणांचा विश्वास, धैर्य, उमेद, आशा यांच्यावर आघात करणाऱ्या
उद्दाम विचारांच्या गोळीचं काय? मनाच्या संवेदनशीलता नामक अवयवावर थेट प्रहार करून
मन खिळखिळं करून टाकणाऱ्या या गोळ्या कोण बाहेर काढणार?
जरा
कुणी प्रवाहविरुद्ध पोहतोय, समजुतींचे गाठोडे उराशी घट्ट धरून बसणाऱ्या समाजाला
आत्ता कुठे जागं करतोय. निर्भीडपणे बोलतोय, स्वतंत्र विचार करतोय. कुठेतरी त्याचे
विचार लोकांना पटू लागलेत. त्याचा हेतू साध्य होऊ लागला आहे.
पण
नाही! त्यांना त्याचे हे विचार पटले नाहीत. त्याने त्यांच्या तथाकथित भावना
दुखावल्या.त्याच्या विचारांना विचारांनी उत्तर देणं काही त्यांना जमणार नाही.
मुळात इतकं खोल जायला वेळ आहेच कुणाकडे? चला, शूट!
संपवूया
त्याला.
कारण
ते जास्त सोपं आहे. इथे कायद्याचं भय कुणालाच नाही. दाभोलकरांना संपवलं ना त्यांनी?
कुठे अजून पकडले गेले आहेत? त्यांचा केसही वाकडा करू शकलेली नाही आमची बहाद्दूर पोलिस
यंत्रणा!
आणि
जनमानसाची भीती आहेच कुणाला? फार फार तर काय होईल? चवीपुरती लाज बाकी असलेले काही
लोक काढतील निषेध मोर्चा, आंदोलन! घसे फुटेस्तोवर घोषणा देतील आणि घरी जाऊन थंड
सरबताचे पेले रिचवतील. आपल्या या पराक्रमाचे कौतुक सोशल मीडियात करतील आणि उद्या
सकाळी आपल्या पोटा-पाण्याच्या विवंचनेसाठी धावू लागतील.
पण
गोळी अजून रुतलेलीच आहे.
जगातील
सर्वात मोठी लोकशाही म्हणून मिरवणाऱ्या या देशात गोळी रुतली आहे.
बोलण्याचे,
जगण्याचे, विचारांचे आणि विश्वासाचे स्वातंत्र्य देणाऱ्या आपल्या राज्यघटनेत गोळी
रुतली आहे.
‘इंसान
का इंसानसे हो भाईचारा’ या गाण्यांतल्या भावनेत गोळी रुतली आहे.
पण
आपल्याला काही वेदना जाणवत का नाही? कुणीतरी काहीतरी बोलले, विचार मांडला अशा
कारणावरून माझ्या राज्यात, माझ्या गावात सरळसरळ खून पडत आहेत. पोलीस हतबल आहेत,
सरकार उदासीन आहे.
आणि
समाज निद्रिस्त आहे, मस्त आहे, सुस्त आहे.
गांधीजी
झाले, दाभोलकर झाले, आता पानसरे मृत्यूशी झुंजत आहेत.
पुढे
कोण?
तू,
मी, तुम्ही, आम्ही? कोण?
या
गोळ्यांच्या भीतीने विचारांना कुंपण घालायचे का? अभिव्यक्ति स्वातंत्र्याला मूठमाती
द्यायची का? मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही... मी निषेध सुद्धा साधा कधी
नोंदवलेला नाही.... या ओळींवर आपलं आयुष्य चालवत राहायचं का ?
की
पेटायचं आपणही?
त्यांनी
विचारांचा सामना गोळ्यांनी केला, आपण या गोळ्यांना विचारांनी उत्तर द्यायचं का? समाज
म्हणून एकवटायचं का? हे शिवधनुष्य पेलायचं का?
आपण
थोडं तरी संवेदनशील व्हायचं का?
No comments:
Post a Comment