Saturday, 28 February 2015

अवेळीच आला पाऊस!

हे काही पावसाचे दिवस नव्हेत.
आत्ता कुठे पळस आणि शाल्मलीत पेटून फुलण्याची स्पर्धा लागली आहे.....
थंडीच्या दिवसांत लपेटून घेतलेल्या दुलया कपाटात गेल्या आहेत....
द्राक्षं ,कलिंगडाचे  ढीग आत्ता कुठे खुणावायला लागले आहेत....

आणि अशातच आज पाऊस!

अवेळी पाऊस म्हणजे आंब्याचं नुकसान, वातावरणात होणाऱ्या बदलांची चिंता....
अवेळी पाऊस म्हणजे ठरलेल्या कामांत विघ्न.....
अवेळी पाऊस म्हणजे भिजलेल्या कपड्यांची काळजी.......


पण या अवेळी पावसानं आज चहाच्या कपात आल्याचा स्वाद आणला.....
सगळी कामं सोडून घरीच बसलेल्या माणसांत गप्पांचा फड रंगला....
ध्यानीमनी नसताना उठलेला  मातीचा दरवळ जुनं काहीतरी सोबत घेऊन आला...

आपण या हवामानचक्राच्याही आहारी गेलोय का हो? हिवाळा संपता संपता आलेल्या पावसाचं आपल्याला इतकं का आश्चर्य वाटतं? आलं असेल आभाळाच्या मनात, की चला आज बरसून जाऊ.......
मनात साठवलेलं काहीतरी उधळून देऊ.......
पाऊस जरासा थांबल्यावर मी रस्त्यावर चक्कर मारून आले आणि मातीच्या गंधाचा, ओल्या हवेचा, गरम गरम बटाटेवड्यांचा वास नाकात घेऊन परत आले.
कुठे छत्री घेऊन जाणारी माणसे दिसली, पावसांत भिजण्याचा निखळ आनंद लुटणारी पोरं दिसली.
अचानक आलेल्या पावसानं खुळावलेलं मन घेऊन त्याचा किंवा तिचा हात हातात घेणारी तरुणाई दिसली....

आपल्याला अपेक्षित नसणारं काही घडलं की चिंता कशाला करायची? बस, स्वार व्हायचं त्या बेभान क्षणावर आणि उंच उडून यायचं.
पक्षी करतात का चिंता, ग्लोबल वॉर्मिंगची? किंवा तुरुतुरु धावणाऱ्या मुंग्यांना येतं का धान्य साठवणीचं टेन्शन ? दूर कुठेतरी हजारो मैलांवर घडणारा हा निसर्गाचा चमत्कार..... जरा खुलेपणानं दाद देऊया की त्याला.....
मातीकडे झेपावणाऱ्या थेंबांना कुठे ठाऊक असतं की आता फेब्रुवारी महिन्यात आपण असं कोसळायचं नसतं म्हणून? त्यांना आस असते फक्त धरतीची.......

असे अवेळी पाऊस यावेत. त्यानिमित्ताने आपल्याला जगण्याचे चक्र मोडायची संधी मिळते.
पाऊस आवडतो, वारा हवा असतो, ओली हवा हुंगायची असते.....
मग जून महिन्याची वाट कशाकरता पाहायची?
ढग दिसले की आपण बरसून जायचं.......
वारा सुटला की आपण उडायला लागायचं........
थेंब पडायला लागले की आपण गंधाळून जायचं....
अवेळी पाऊस आला की आपणही अवेळी खूष होऊन जायचं.......


Tuesday, 17 February 2015

आपण थोडं तरी संवेदनशील व्हायचं का?


बंदुकीतून सुटलेली गोळी ज्या माणसावर झाडली जाते त्याच्या शरीरावर जीवघेणे आघात करत खोल घुसते. जखम होते, रक्तस्त्राव होते आणि त्याच्या जीवन-मरणाचा झगडा सुरु होतो. डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करून गोळ्या बाहेर काढतात आणि त्याचे प्राण वाचवतात.

पण त्या धातूच्या गोळीसोबत अनेक जणांचा विश्वास, धैर्य, उमेद, आशा यांच्यावर आघात करणाऱ्या उद्दाम विचारांच्या गोळीचं काय? मनाच्या संवेदनशीलता नामक अवयवावर थेट प्रहार करून मन खिळखिळं करून टाकणाऱ्या या गोळ्या कोण बाहेर काढणार?

जरा कुणी प्रवाहविरुद्ध पोहतोय, समजुतींचे गाठोडे उराशी घट्ट धरून बसणाऱ्या समाजाला आत्ता कुठे जागं करतोय. निर्भीडपणे बोलतोय, स्वतंत्र विचार करतोय. कुठेतरी त्याचे विचार लोकांना पटू लागलेत. त्याचा हेतू साध्य होऊ लागला आहे.

पण नाही! त्यांना त्याचे हे विचार पटले नाहीत. त्याने त्यांच्या तथाकथित भावना दुखावल्या.त्याच्या विचारांना विचारांनी उत्तर देणं काही त्यांना जमणार नाही. मुळात इतकं खोल जायला वेळ आहेच कुणाकडे? चला, शूट!
संपवूया त्याला.

कारण ते जास्त सोपं आहे. इथे कायद्याचं भय कुणालाच नाही. दाभोलकरांना संपवलं ना त्यांनी? कुठे अजून पकडले गेले आहेत? त्यांचा केसही वाकडा करू शकलेली नाही आमची बहाद्दूर पोलिस यंत्रणा!

आणि जनमानसाची भीती आहेच कुणाला? फार फार तर काय होईल? चवीपुरती लाज बाकी असलेले काही लोक काढतील निषेध मोर्चा, आंदोलन! घसे फुटेस्तोवर घोषणा देतील आणि घरी जाऊन थंड सरबताचे पेले रिचवतील. आपल्या या पराक्रमाचे कौतुक सोशल मीडियात करतील आणि उद्या सकाळी आपल्या पोटा-पाण्याच्या विवंचनेसाठी धावू लागतील.

पण गोळी अजून रुतलेलीच आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून मिरवणाऱ्या या देशात गोळी रुतली आहे.
बोलण्याचे, जगण्याचे, विचारांचे आणि विश्वासाचे स्वातंत्र्य देणाऱ्या आपल्या राज्यघटनेत गोळी रुतली आहे.
‘इंसान का इंसानसे हो भाईचारा’ या गाण्यांतल्या भावनेत गोळी रुतली आहे.

पण आपल्याला काही वेदना जाणवत का नाही? कुणीतरी काहीतरी बोलले, विचार मांडला अशा कारणावरून माझ्या राज्यात, माझ्या गावात सरळसरळ खून पडत आहेत. पोलीस हतबल आहेत, सरकार उदासीन आहे.
आणि समाज निद्रिस्त आहे, मस्त आहे, सुस्त आहे.

गांधीजी झाले, दाभोलकर झाले, आता पानसरे मृत्यूशी झुंजत आहेत.
पुढे कोण?
तू, मी, तुम्ही, आम्ही? कोण?

या गोळ्यांच्या भीतीने विचारांना कुंपण घालायचे का? अभिव्यक्ति स्वातंत्र्याला मूठमाती द्यायची का? मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही... मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही.... या ओळींवर आपलं आयुष्य चालवत राहायचं का ?

की पेटायचं आपणही?

त्यांनी विचारांचा सामना गोळ्यांनी केला, आपण या गोळ्यांना विचारांनी उत्तर द्यायचं का? समाज म्हणून एकवटायचं का? हे शिवधनुष्य पेलायचं का?

आपण थोडं तरी संवेदनशील व्हायचं का?





Friday, 13 February 2015

प्रेमाचा दिवस, चला प्रेम करूया!

आज प्रेमाचा दिवस आहे. कुणी म्हणेल की प्रेम असं एका दिवसाच्या चौकटीत बंद करता येतं का? ते तर असीम आहे,.. पण मला वाटतं की प्रेमाचा दिवस साजरा करणं म्हणजे प्रेमावर दिवसाचा शिक्का मारणं नव्हे तर आपलं रोजचं आयुष्य अर्थपूर्ण करणाऱ्या या भावनेला सलाम करणं आहे.

प्रेम या शब्दासोबत काळजात उठणारी गोड कळ ज्याने सोसली आहे त्याला नेमकं कळेल की हे प्रेम म्हणजे काय चीज आहे ते......
इतक्या मोठ्या जगाच्या पसाऱ्यात
असा एक हात असतो की जो हातात घेतल्यावर जगावर राज्य केल्यासारखं वाटतं.........
असा एक खांदा असतो की ज्याच्यावर डोकं टेकल्यावर सगळं ओझं उतरल्याचं समाधान मिळतं.......
अशी एक मिठी असते की जिथे काळ-वेळाची गणितं थांबल्यासारखी वाटतात........
असं एक हसू असतं की ज्याच्यासाठी पुन्हापुन्हा जन्म घ्यावासा वाटतो......
अशी एक व्यक्ती असते की जिच्यासोबत काही क्षण घालवण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायची तयारी असते....
असं कुणी असतं की ज्याच्या केवळ असण्यानं आपल्या जगण्याला अर्थ मिळतो..........

प्रेमात पडलेल्या, बुडलेल्या, तरलेल्या आणि हरलेल्या सर्वांसाठी ही कविता:

प्रेमात कुणी पडते, कुणी बुडते...
प्रेमात कुणी हरते, कुणी तरते...

प्रेमात कुणी जळते, कुणी तेवते...
प्रेमात कुणी फुलते, कुणी गळते...

प्रेमात कुणी दरवळते, कुणी मोहरते...
प्रेमात कुणी गुणगुणते, कुणी हळहळते...

प्रेमात कुणी विस्कटते, कुणी सावरते...
प्रेमात कुणी सोसते, कुणी भोगते...

प्रेमात कुणी जगते, कुणी मरते...
प्रेमात कुणी असते, कुणी नसते...