Monday, 27 May 2013

झंझावात.…………. 

जुने मित्र-मैत्रिणी, ती धमाल..........................
जंगलाच्या सान्निध्यातले शांत क्षण, ती हिरवाई, शीळकरी कस्तुराची जादुई शीळ..........................
कुणावरतरी झपाटल्यासारखं प्रेम करून त्याच्या प्रेमात आयुष्यभरासाठी बुडून गेलेली मी..........................
एका ध्येयानं झपाटून जाऊन पुस्तकांमध्ये आणि अभ्यासामध्ये गढून गेलेली मी.......................
सगळं बरं चाललं होतं माझं. नवरा,कुटुंब,पक्षी,झाडं, पुस्तकं, झालंच तर प्रवास,गप्पा,खवय्येगिरी असं सगळं जिथल्यातिथे,सुखात सुरु होतं. मग अचानक जुनं भूत जागं झालं आणि आयुष्यात कधी केला नसेल एव्हढा अभ्यास करून Indian Forest  Service च्या मुलाखतीपर्यंतसुद्धा पोचले. जग जिंकल्यागत वाटत होतं तेव्हा.
पण .......................
एका झंझावातानं माझ्याही नकळत माझ्या आयुष्यात प्रवेश केला होता. एका असामान्य माणसानं माझ्यावर गारुड घातलं होतं.
माझ्या शब्दकोशातल्या जंगल,पक्षी आणि निसर्ग यान शब्दांच्या जागी आले देश, समाज, लोकशाही, कायदे, अन्याय, लढा,संघर्ष,भ्रष्टाचार,राजकारण........................................
दुर्बिणीच्या जागी आली लेखणी...
झपाटल्यागत मी स्वराज नावाच्या पुस्तकाचा अनुवाद केला, तो छापण्याचा चंग बांधला, किती अडचणी आल्या तरी मी माझा ध्यास सोडला नाही.
का? का करतीये मी हे सगळं? कोण कुठले हे अरविंद केजरीवाल,प्रशांत भूषण,मनीष सिसोदिया,मयांक गांधी,अंजली दमानिया प्रीती.शर्मा आणि असे कित्येक ...........................
माझे कोण लागतात हे ? का मी त्यांना माझा  आदर्श मानते? का त्यांच्या एका शब्दासाठी सगळं पणाला लावावंसं वाटतं?
माझ्या आयुष्याची दिशा पूर्णपणे १८० अंशांत वळवणारे कोण हे ?आपापलं सुखाचं आयुष्य सोडून कुठला वेडा ध्यास
घेऊन बसलेत हे सगळे? आणि माझ्यासारख्या कितीजणांचं जगणं बदललंय यांनी?
सगळ्या प्रश्नांचा मनात नुसता कल्ला होतो, आणि मग कुठल्यातरी गाण्यांनी हे असं काहीतरी उचंबळल्यासारखं होतं.
इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं काहीतरी अंधुकसं आठवायला लागतं. फरक एवढाच की गांधीजी,सुभाषबाबू,भगतसिंग यांच्या जागी हेच लोक दिसायला लागतात. त्यांची दांडी यात्रा,यांचा बिजली पानी सत्याग्रह,त्यांची आझाद हिंद फौज,यांची आम आदमी पार्टी..................
भारत स्वतंत्र झाला, पण ज्यासाठी अट्टाहास केला ते स्वराज्य, सुराज्य आलंच नाही हे पाहून स्वातंत्र्यसैनिकांचे अस्वस्थ आत्मे तर पुन्हा जन्मले नाहीत ना?
काहीही असो, स्वतःच्याच कोशात जगणाऱ्या माझ्यासारख्या कित्येकांना यांनी गाढ झोपेतून जागं केलं. उठा,संघर्ष करा, देश धोक्यात आहे....................
त्यांची हाक पोचली माझ्या हृदयापर्यंत..... असं वाटलं यांच्या प्रामाणिक हाकेला आज प्रतिसाद दिला नाही तर कायमची रुखरुख लागेल मनाला.
three idiots मधलं वाक्य आठवलं, टॅक्सी आयी थी, हात में letter था, थोडीसी हिम्मत जुटाता तो जिंदगी बदल जाती...
मग ठरवलं, मनाचं ऐकायचं, जे व्हायचं ते होईल..
आणि उतरले मी या लढाईत.मनापासून.
आम्ही जग बदलून टाकू असं नाही म्हणणार मी.. पण एवढं नक्की की उद्या पुढच्या पिढीला गर्वानं सांगू की देश वाचवण्यासाठी, व्यवस्था बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त तरी केली.
आपली कातडी बचावत, स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यात सुरक्षित ठेवून सगळ्या जगालाच दोष देत राहण्याचा निर्लज्जपणा तरी मी केला नाही याचा मला अभिमान आहे.
तुमच्या मनात देशाबद्दल, आपल्या समाजाबद्दल खंत करणारा मिणमिणता दिवा जरी असेल ना तरी यथाशक्ती आम आदमी पार्टीत सामील व्हा, आत्ता जर ही संधी सोडली तर आयुष्यभर पस्तावत राहण्याखेरीज आपण काहीही करू शकणार नाही.

ऋजुता खरे.


No comments:

Post a Comment